बघता बघता गणपती बाप्पाला घरी येऊन १० दिवस झाले. बाप्पा घरी आल्यावर महाराष्ट्रातील खास असा पुरणाचा पाहुणचार आपल्या ह्या लाडक्या पाहुण्याला केल्याशिवाय त्याला कसा निरोप देणार. बाप्पाला खास आवडणारं नैवेद्य म्हणजे मोदक. तर अशी पुरण आणि मोदकाची सांगड घालत पाहूया कसे बनवायचे पुरणाचे मोदक.
साहित्य:
पुरणा साठी:
- १ कप चणा डाळ
- १ छोटा चमचा तांदूळ
- १ १/४ कप साखर
- २ कप पाणी
- १/४ छोटा चमचा विलायची पूड
- १/४ छोटा चमचा जायफळ पूड
पाती साठी:
- १ १/२ कप गव्हाचे पीठ
- मीठ (चवी पुरते)
- २ चमचे तेल
- पाणी
तेल तळण्यासाठी
कृती:
सर्वप्रथम चणा डाळीतच तांदूळ टाकून स्वछ धुवून त्यात २ कप पाणी टाकून कुकरमध्ये शिजायला ठेवा. चणा डाळ छान शिजण्यासाठी कुकर ला ५-६ शिट्ट्या होऊ द्या. कुकर थंड झाला कि डाळ काढून त्यात साखर टाकून मध्यम आचेवर शिजवायला ठेवा. साखर खाली लागू नये म्हणून सतत ढवळत राहा. साखरेला पाणी सुटेल. साखरेचं पाक झाला कि मिश्रण घट्ट होईल. मिश्रण घट्ट झाले कि गॅस बंद करा. ५-१० मिनिटांनी मिश्रण गरम असतानाच ते पूरण यंत्रातून ( पुरणासाठी असलेल्या चाळणीतून) काढून घ्या. आता पुरणात विलायची आणि जायफळ पूड टाकून चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या. तयार पुरण झाकून थंड होण्यासाठी ठेऊन द्या.
आवरणासाठी :
पीठ, तेल, मीठ आणि पाणी एकत्र करून चपातीला लागतेतशी कणिक भिजवून घ्या. कणिक साधारण ३० मिनिटे झाकून ठेवा.
मोदकसाठी :
पुरीसाठी लागतात तसे कणकीचे छोटे गोळे करून घ्या. कणकीचा गोळा पुरी प्रमाणे लाटून घ्या. पुरीच्या मध्ये एक चमचा पुरण टाकून तिला मोदकाच्या आकारात वळून घ्या. अश्याप्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या. कढईत तेल गरम करून सर्व मोदक मंद ते मध्यम आचेवर तळून घ्या. तयार आहेत पुरणाचे मोदक.
संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Comments
Post a Comment